सुश्री शीला पतकी
कवितेचा उत्सव
☆ “टांगलेले शिंकाळे…” ☆ सुश्री शीला पतकी ☆
☆
बाल मुकुंदाचे लोणी
शिंक्क्यांमध्ये ग टांगले
ईगतीने केले फस्त
सारे पसार पांगले
*
जनाबाईचा भाकऱ्या
सावत्याचा भाजीपाला
गोऱ्या कुंभाराचा कर्हा
त्याने राखिला राखीला
*
दारांमध्ये टांगलेला
त्यांन राखीला कोहळा
कुणा पाप्याची नजर
नाही लागली घराला
*
रानी पेरायच्या बिया
बीज टांगून राखले
जिमिनीत किती किती
किडा मुंगीचे दाखले
*
टांगलेले शिंके मला
सांगे संसाराचे सार
दोन जीव टांगणीला
परी एकच ईचार
*
दोन दोऱ्या दोन जीव
एकमेकांत गुंतती
जीव लावती टांगणी
अन् आधार ग देती
☆
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈