श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ जागा सुखदायी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
उजळायाच्या कधी सावल्या
भवती अंधाराच्या
तुडवत आलो खूप लांबवर
वाटा दैवगतीच्या
अजून नाही भाग्य लाभले
झाल्या तिन्हीसांजा
मीच लागलो मागे आता
दुर्धर दुर्भाग्याच्या
तोल सावरत आलो धावत
काळा संगे जेंव्हा
तेंव्हा सा-या संपत गेल्या
भेटी दिलदारांच्या
चित्तथरारक असते खेळी
आपल्या आयुष्याची
सांभाळावे तिला लागते
वाटेवर जगण्याच्या
चालतजाव्या निवांत सा-या
चाली संसाराच्या
नको कधी ही बिघडायाला
नादाने भलत्यांच्या
जमेल जेव्हा असे वागणे
साधे भोळे तेव्हा
दिसतील जगा समोर तुमच्या
सुखदायी जगण्याच्या
किती लागलो होतो मागे
क्षणिक आनंदाच्या
या देहाच्या होत्या खेळी
केवळ हव्यासाच्या
जेव्हा कळले तेंव्हा पडली
आत्म्यालाही भ्रांती
पुन्हा जाहलो स्वाधीन तेव्हा
अखेर वास्तवतेच्या
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈