श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ खुशाल टाळा… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
☆
खुशाल टाळा टाळणार पण मजला कुठवर
चुकवा रस्ते, द्या गुंगारा
असेन मी तर हर वळणावर
*
नगरीमधुनी खुशाल तुमच्या करा बहिष्कृत
वेसपारच्या वाड्यावस्त्या
उत्सुक माझे करण्या स्वागत
*
लपवाछपवी फसवाफसवी सोपी नाही
क्ष-किरणांच्या नजरेमधुनी
दगा आतला सुटणे नाही
*
गृहीत धरणे सदाकदा मज धोकादायक
प्रशांत सागर परी तळाशी
वडवानल मी खात्रीलायक
*
कृतघ्नतेने तुमच्या भरला गळवट रांजण
आज क्षमेचे शांत चांदणे
उद्या कदाचित अग्निप्रभंजन
*
सोन्याची ही तुमची लंका तुमचे भूषण
अभिमानी ही माझी फकिरी
माझ्यासाठी माझे त्रिभुवन!
☆
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
२५. ११. २०२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈