डॉ. शैलजा करोडे
कवितेचा उत्सव
☆ “पंचारती…” ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
(अष्टाक्षरी)
☆
माय मराठी आमची
झाली आज अभिजात
ओवाळून पंचारती
करू तियेचे स्वागत
*
अमृताते पैजा जिंके
ज्ञानदेव वर्णी ख्याती
तुकयाच्या अभंगाची
काय वर्णावी महती
*
नाणेघाटी शिलालेख
लेणी पर्वती मिळाले
भाषा आहे ही प्राचीन
किती द्यावेत दाखले
*
माय मराठी आमची
मना मनात वसते
गोडी अवीट अमिट
जना जनात रूजते
*
संत साहित्य ते थोर
तुकाराम ज्ञानेश्वर
सारस्वती मांदियाळी
गडकरी खांडेकर
*
जन मानस मराठी
महाराष्ट्री संस्कृतीस
ओवाळून पंचारती
करू साजरे क्षणास
☆
© डॉ. शैलजा करोडे (काव्यशलाका)
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈