☆
सखे शेजारीण बाई
काय सांगू महती तिची
अम्रुताचे घट भरले गं
माझ्या मराठी भाषेत
*
जात्यावरच्या ओव्या गाई
दळण दळता दळता
एक एक शब्द गुंफियेला
घाली नात्यांची सांगड त्याला
*
ज्ञानेश्वर, तुकोबांनी रचल्या
अभंग आणि पोथ्या
किती संतांनीही त्यात
लिहील्या आरत्या आणि ओव्या
*
गणगौळण, पोवाडा, भारुड आणि फटका
कवीलोकांनी रचल्या किती
लोकसाहित्यातून जपला त्यांनी
मायमराठीचा बाणा
*
मिरविते गळा साज
काना, मात्रा, वेलांटीचे
तिच्या लल्लाटी शोभती
जसे सुरेख दागिने
*
कुसूमाग्रजांची, विंदांची
खांडेकर, गडकरींची
नाट्यप्रयोगात रंगली
माझी माय मराठी ही
*
अशी सुसंस्कृत आणि शालीन
राज्यभाषा गं मराठी
जयघोष तिचा चाले सारा आसमंती गाजवी
☆
© सुश्री त्रिशला शहा
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈