कवी स्व वसंत बापट
जन्म – 25 जुलाई 1922
मृत्यु – 17 सितम्बर 2002
☆ कवितेचा उत्सव ☆ हे कुसुमाग्रज ! ☆ कवी स्व वसंत बापट ☆
दूरस्थ विशाखा किरणांच्या स्पर्शाने
उद्ध्वस्त किनारा अस्तित्वाचा झाला
अन् सात नभांची क्षितीजे पार कराया
नाविकांस आम्हा जोश अनोखा आला
पालवल्या फिरूनी अनंत अमुच्या आशा
अन् ध्येयासक्ती अनंत पेटुनि उठली
मग दिली बळींनी बलवंता आव्हाने
मृत्यूंजय आम्ही,आम्हांस भीती कुठली
हे कुसुमाग्रज ! तुम्ही रहिवासी गगनाचे-
परि कृतार्थ केली तुम्ही मराठी माती
या मातीमधल्या अगण्य अणुरेणूंची
जोडलीत सार्या नक्षत्रांशी नाती
तुम्ही कुठे कुणाला कधी दिला उपदेश
कधी बोट धरून नच चालवले कवणाला
प्रवचने,चिकित्सा सदैव केली वर्ज्य
परि कविकुलगुरू ही पदवी फक्त तुम्हाला
हे मुक्त विहंगम,निळ्या नभाच्या पांथा
तू असाच राही पेरीत उज्वल गाणी
गुंफित रहा तू कृतिशुरांच्या गाथा
अन् पेटव विझल्या डोळ्यामधले पाणी
कवी – स्व वसंत बापट
(चित्र साभार लोकमत https://www.lokmat.com/maharashtra/todays-memorial-day-vasant-bapat/)
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈