सौ. ज्योती कुळकर्णी
कवितेचा उत्सव
☆ नवी ओळख.. ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆
(वृत्त:कालिंदनंदिनी)
☆
फुलातली खुळी कळी झुलावयास लागली
वयात येत ती पहा नटावयास लागली
*
मनात गोड स्वप्न आणि सोबतीस चंद्रमा
नभात चांदणी पुन्हा हसावयास लागली
*
सुरेख अंगणात रोप लाविले सुरेखसे
फुले दवात न्हायली डुलावयास लागली
*
उनाड मोकळ्या मनास सैल सोडले जरा
जुनी विचार बंधने नडावयास लागली
*
विकास साधण्या तिच्या मनात बीज पेरले
अता तिची गती तुला खुपावयास लागली!
*
शिरात पेच खोचला तिला दिलास मान हा
ऋणात राहता तुझ्या झुकावयास लागली
*
पती वरून ओळखू नका तिला खरे तुम्ही
तिची नवीन अस्मिता जपावयास लागली
☆
© सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈