श्री सुनील देशपांडे
कवितेचा उत्सव
☆ “तूच तू…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
(२००९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या माझ्या पत्नीसहस्रनाम या पुस्तकातून)
☆
शक्ती तूच, स्फूर्ती तूच, तूच कीर्तीदायिनी।
तेज तूच, बुद्धी तूच, जीवन सौदामिनी ।।
कर्म तूच, मर्म तूच, तूच मार्गदायीनी।
भीती तूच, शौर्य तूच, तूच धैर्यवर्धिनी।।
*
अमर तूच, मर्त्य तूच, तूच काळ व्यापिणी।
तमसांतिका अन् तू प्रकाशिका, तूच विश्वस्वामिनी।।
ब्रम्ह तूच अन माया, तूच सर्व साक्षिणी।
प्राण तूच, मान तूच, तूच देवी मानिनि।।
*
मुग्धा हि तू, कृद्धा हि तू, तूच रौद्ररागिणी।
दुर्गा अन् काली तूच, असुर संहारिणी।।
काटे अन् फूल तूच, तूच गे सुवासिनी।
वंथनात मुक्त तूच, तूच हृदयवासिनी।।
*
प्रीत तूच, गीत तूच, तूच सौख्य दायिनि ।
शब्द तूच, अर्थ तूच, तूच वाग्विलासिनी ।।
अर्थ, काम, मोक्ष तूच, तूच धर्मचारिणी ।
तूच भाव, तूच देव, तूच पत्नि रूपिणी।।
☆
© श्री सुनील देशपांडे
email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈