प्रा. सौ. सुमती पवार
कवितेचा उत्सव
☆ तिची वाट वेगळीच… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
☆
तिची वाट वेगळीच हाती बुकच धरावे
इवल्याशा साऊला त्या स्वप्न बुकाचे पडावे
होता जुना तो जमाना पोरी नव्हत्या शिकत
बुक घेऊन सासरी आली लपत छपत..
*
होती डोक्याने ती तेज जोतिबाची ती सावली
तिची शिक्षणाची आस जोतिबाने हो जोखली
स्वत: केला शुभारंभ अक्षरांना गिरवत
सावित्रीच्या शिक्षणाची झाली पहा सुरूवात..
*
जमाना तो आडमुठ्ठा होता अडाण्यांचा गाव
शेणमारा दगडांचा रोज होतसे वर्षाव
आडदांड आडमुठ्ठे रोज अडविती वाट
एक धटिंगण आला साऊ समोरच थेट…
*
हात उचलता त्याने तिने खोचला पदर
श्रीमुखातच दिली तिथे सर्वांच्या समोर
गेली शाळेत तशीच तिने शिकवला धडा
पण सोडावा लागला तिचे सासर नि वाडा..
*
नाही हारले हो दोघे, हाडाची ती केली काडे
अनाथ नि निराश्रीत त्यांना उघडले वाडे
झाले पाळणाघर नि शिक्षणाची गंगा सुरू
सावित्री नि जोतिबा हे साऱ्या विश्वाचेच गुरू…
☆
© प्रा.सौ.सुमती पवार
नाशिक
मो. ९७६३६०५६४२; ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈