प्रा. सौ. सुमती पवार
कवितेचा उत्सव ☆ किमया विज्ञानाची ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
विज्ञानाची सारी किमया, सारी सुखे हो उभी पहा
ग्रह गोलांना दाखविते ती, दुर्बिण महाकाय महा…
भौतिक सारी सुखे हाताशी, आरामदायी जीवन
घरबसल्या हो सारे मिळते, नको फिराया वणवण
सारे सारे सोपे झाले, कामे झाली किती कमी
वेगाने ती होती कामे, वेळ बचतीची ही हमी..
इंटरनेटने जग जवळहे, क्षणातच सारे कळते
जग आता चालत नाही, सुसाट वेगाने पळते..
लॅाकडाऊनचा काळ नेट ने फार सुखावह तो केला
स्काईप वरती नातलगांशी प्रत्येकच जण बोलला
झाल्या मिटिंगा संमेलनेही काळ कुठे न थांबला
गाडी सुरू राहून पहा हो माणूस नाही आंबला..
शाळा शिक्षण काम काज ते पहा राहिले हो चालू
विज्ञानाचे महत्व आपण सारे जाणू नि मानू
एक फोन करताच पहा हो सारी सुखे ती हाताशी
अवघ्या काही तासातच हो विमान गाठते हो काशी…
शस्र आहे पहा दुधारी संयम त्यावर उपाय
अघोरी पणा करी घात हो करतो मग तो अपाय
वापरले जर नीट पहा ते फक्त आहे वरदान
पान न हाले त्याच्या वाचून….
विज्ञान विश्वाची…. शान…
© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक
दि: ३/०२/२०२१
वेळ: ०५:०९
(९७६३६०५६४२)
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈