डॉ. तेजस्विनी वाळिंबे
अल्प परिचय
वैद्यकीय
- सहकार नगर, पुणे येथे गेली 25 वर्षे नेत्रतज्ञ म्हणून कार्यरत.
- काचबिंदू व मधुमेहातील नेत्रविकार यातील विशेष प्रशिक्षण.
- अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय वैद्यकीय परिषदांमध्ये काचबिंदू या विषयावर व्याख्याने.
- Antiglaucoma drug trials मध्ये सहभाग.
साहित्यिक
- ‘पाहू आनंदे, ‘ व ‘स्मृति-सुधा’ ही पुस्तके प्रकाशित.
- मराठी साहित्य, योगशास्त्र, भारतीय तत्वज्ञान, चित्रकलेची विशेष आवड.
कवितेचा उत्सव
☆ स्वातंत्र्याचं वारं… ☆ डॉ. तेजस्विनी वाळिंबे ☆
(प्रतिकूल कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थितीत आपलं स्वातंत्र्य व अधिकार मिळवण्यासाठी झगडलेल्या सर्व स्त्रियांनी समर्पित)
☆
एकदा असाच वारा आला
पिंजऱ्यातला पक्षी मुक्त आकाशात झेपावला
आजी माझी सांगत होती….
एकदा असाच वारा आला
घोंगावणारा वारा तिला उंबऱ्याबाहेर घेऊन गेला
वाऱ्याच्या झटापटीत खिडकीची तावदाने फुटली
घरातल्या कोंदट हवेला मोकळी वाट मिळाली
असाच एकदा वारा आला
स्वामित्वाच्या भिंती फुटून अहंकार चिरडल्या गेला
घरी-दारी कल्लोळ उठला
पिंजऱ्याच्या लोखंडी दांड्या तोडून वारा आत घुसला
आजी माझी सांगत होती…
जेव्हा असा वारा आला
माझ्या सखीच्या मनी आकांक्षांचे पंख फुटले
चिमुकल्या पंखांना तिच्या वाऱ्याने बळ दिले
स्वातंत्र्याच्या प्रकाशाने आकाश उजळून निघाले
निळ्या नभाच्या मोहकतेने तिचे मन आनंदले
असाच एकदा वारा माझ्याही घरी आला
शीतल स्पर्श करून मला हलकेच म्हणाला
“ऊठ हो जागी चल जाऊ या, उंच नभी “
असाच एकदा वारा आला
…आकांक्षेला स्वातंत्र्याचे पंख लावून गेला
☆
© डॉ. तेजस्विनी वाळिंबे
(नेत्रतज्ञ)
पुणे मो. ८८८८८३१९०५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈