श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 277 ?

☆ कोरडवाहू डोळे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

ते कोरडवाहू डोळे, मला भेटले होते

ओठांचे गुलाब मीही, त्यास पाजले होते

*

पहिल्यांदा भेटुन सुद्धा, कसा भाळला इतका

मी काही केले नव्हते, फक्त लाजले होते

*

तो वितळत गेला गोळा, ओठी विस्तव होता

बर्फाच्या गोळ्यांने हे, अधर जागले होते

*

विश्वाच्या गोंगाटाचे, ध्यान कुणाला येथे

दोघांच्या एकांताने, विश्व व्यापले होते

*

नजरेचा रोख तयाच्या, पदराला कळलेला

पदराने दोन्ही खांदे, फक्त झाकले होते

*

प्रेमाच्या आणाभाका, कधी घेतल्या नाही

मुखड्यावर घेणे मुखडे, नित्य टाळले होते

*

हे विलासमंदिर होते, कुठेच माती नव्हती

मी फरशी काढुन तेथे, रोप लावले होते

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments