सौ विजया कैलास हिरेमठ
कवितेचा उत्सव
☆ “शब्द एक छंद….” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆
☆
शब्द हसतात ,शब्द रुसतात
शब्द एकांतात सोबत करतात…
शब्द टोचतात,डोळ्यात अश्रू आणतात
सावरून घेतात, सांत्वनही करतात
शब्दांना असते धार,शब्द करतात वार
जपून करतो आम्ही शब्द व्यवहार
शब्दांना असतो ताल,शब्दांना असते चाल
शब्द समजूतदार,देतात आधार
शब्दांना असते वजन,उंची,भाव
घेतात मनाचा अचूक ठाव…
शब्दांना असतो वारसा
शब्दांविण भाव पोरका
काय वर्णावा शब्द महिमा
शब्द इथे माझा उणा…
शब्दांची चढता नशा
अंकुरतात नव्या आशा
शब्दांनी दिली जीवना दिशा
शब्द माझी अभिलाषा…
शब्द एक छंद
दरवळणारा सुगंध
जुळता ऋणानुबंध
भाव सारे स्वच्छंद…
☆
💞शब्दकळी विजया 💞
© सौ विजया कैलास हिरेमठ
पत्ता – संवादिनी ,सांगली
मोबा. – 95117 62351
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈