कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव ?

☆ गुढीची आरती… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(स्वरचित आरती)

ब्रम्हध्वजाच्या निजरूपाची  गुढी देवता शुभंकरी

ओवाळू या सकल आरती मनोकामना करा पुरी. ||धृ||

*

आम्रपल्लवी तोरण दारी,सडा रांगोळी,पाट नवा

वेळू लांबसा,कलश सुपारी,हारफुलांचा थाट हवा

वर्षारंभी सण हा आला, मुहूर्त मंगल खरोखरी

ओवाळू या सकल आरती मनोकामना करा पुरी.||१||

*

चैत्र पालवी,सृजन संपदा, नवकुसुमांनी नटे धरा

माधुर्याची साखर गाठी, आरोग्य दायी निंब खरा

सौभाग्याचे हळदी कुंकू, कलश यशश्री हवा वरी

ओवाळू या सकल आरती मनोकामना करा पुरी.||२||

*

मांगल्याचा पुष्पहार तो संकल्प सिद्धीची गुढी दारी

सामर्थ्य दाखवी वेळू काठी, पहा साडी वैभव जरतारी

नैवेद्याची पहा खासियत, बासुंदी ‌वा श्रीखंड पुरी

ओवाळू या सकल आरती मनोकामना करा पुरी.||३||

*

पंचांगाचे करूनी पुजन, आनंदाने सजवू तुला

साडेतीन मुहूर्तांपैकी, चैत्र मुहूर्ती झुले झुला

गुढी पाडवा सण सौख्याचा, फुटे पालवी तरूवरी

ओवाळू या सकल आरती मनोकामना करा पुरी.||४||

*

आकाशाचे पत्रक सांगे, पंचांगाचा अर्थ नवा

सुख शांती समाधान ते,आरोग्याचा हात हवा.

नको कशाची कमी आम्हाला, दान कृपेचे आम्हावरी

ओवाळू या सकल आरती मनोकामना करा पुरी.||५||

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments