सौ. शशी नाईक-नाडकर्णी
☆ कवितेचा उत्सव ☆ माझी मराठी… ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
सदैव माझ्या ओठी
माझी माय मराठी
लेई शब्द पैठणी जरतार
त्यावरी घाले शब्दालंकार
सात्विक सालस नार
वेळी होई ती धारदार
मुकुट तिचा एकार,ओकार,
इकार कधीतरी रफार
पायी रुणझुणती उकार,
बिन्दी भाळी अनुस्वार
कधी अर्ध,कधी पूर्णविराम
कधी स्वल्प,कधी प्रश्न चिन्ह
कर्मणि,कर्तरी,प्रयोग, भावे
भूत, वर्तमान,भविष्य, काळासवे
ज्ञानेश्वर आद्य उपासक
समर्थ,तुका,नाथ पूजक
राजा शिवबा असे रक्षक
अभंग,भजन,प्रवचन
कीर्तन, चर्चा, भाषण
कथा, कादंबरी, कहाणी
लोकगीत, पोवाडा, लावणी
भारूड, नाटक, नाट्यछटा,
एकपात्री, विडिओ,सिनेमा
कित्येक पैलू आईचे या
वाणी तोकडी वर्णाया
लेकरे अमाप,क्षेत्रे तिची मोठी
वर्णू किती,मती माझी थिटी
माझ्या मराठीची अशीच ऐट
विचारू नका तिचा थाटमाट
दर बारा कोसी भिन्न हिचा अवतार
तरी एक असे ही माझी म्हराठ्ठी नार
© सौ. शशी नाईक-नाडकर्णी
फोन नं. 8425933533
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈