कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 244 – विजय साहित्य
☆ पाण्याचा परीस… ☆
(अभंग वृत्त.)
☆
नाना बाळलेणी …
सजविली गेही
बाळकडू देही …
पाण्या तुझें….! १
*
आयुष्य प्रवास …
खोल उरातून
जलास टाळून …
शक्य नाही….!२
*
भागविते तृष्णा …
जिवनाची धार
जीवन आधार …
जलस्रोत…!३
*
कोरड्या मनाला …
माणसांची आस
पावसाळी श्वास …
पाण्या तुझा ….! ४
*
पाण्यासाठी होई …
त्रिलोकी संचार
पाणी उपचार …
फलदायी…!५
*
पाण्याविना जीव …
जाई आभाळात
येतसे धोक्यात …
लवलाही…!६
*
पाण्याचे आभाळ …
पाण्याची जमीन
सजीवांची नीव …
पाणी पाणी …!७
*
सजीवांची वृद्धी …
निर्जीवांचा क्षय
नको अपव्यय …
पाण्याचा या..!८
*
पिकल्या फळांची …
कोवळ्या पानांची
पैदास धान्याची …
पाण्यावर….!९
*
पाण्याचीच वाफ …
वाफेतून वीज
सृजनाचे बीज …
शक्ती रूप…!१०
*
येताना जाताना …
क्रिया विधीसाठी
जीवनाच्या गाठी …
आचमनी…!११
*
कुणीच नाही रे …
जगी पाण्याविना
सृष्टी तरलीना …
दिगंतरी…!१२
*
आईचा गाईचा …
पान्हा कसदार
जीवन आधार …
जलबिंदू…!१३
*
पंचमहाभूती …
पाण्यातच शक्ती
पाण्याची आसक्ती …
ठायीं ठायीं…!१४
*
पाण्याचा परीस …
सौभाग्य कनक
सृजन जनक …
संजीवक…!१५
*
कविराज शब्दी …
साकारे घागर
आकारे सागर …
आशिर्वादी…!१६
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈