कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रीरामनवमी विशेष – राम अलौकिक सेतू… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(अष्टाक्षरी)

चैत्र‌ शुद्ध नवमीस,

होई राम जन्मोत्सव.

राम नवमीचा दिन ,

मांगलिक महोत्सव…!१

*

मानव्याचा दैवी अंश,

रामलीला अवतारी.

कोटी श्लोक याची गाथा,

दृष्ट दानव संहारी…!२

*

धर्म,मोक्ष,अर्थ,काम,

राम आदर्श आरसा.

राजनीती कुलाचार,

शौर्य,धैर्याचा वारसा…!३

*

राम हरी अवतार,

विष्णु अंश नारायण .

चार दाशरथी चंद्र ,

अयोध्येचे नभांगण…! ४

*

राम राम म्हणोनीया,

जन भेटती जनाला.

रामरक्षा फलदायी,

रामचंद्र जपमाला…! ५

*

राम नात्यांचा संस्कार,

देई जगता आधार.

एका एका प्रसंगात,

राम सगुण साकार…!६

*

राम लक्षुमण जोडी,

तैसे भरत शत्रुघ्न.

कैकयीच्या अट्टाहासे,

आले संशयाचे विघ्न…! ७

*

राम दैत्य संहारक,

राम लिला निजरूप.

धीरोदात्त क्षात्रतेज ,

राम कैवल्य स्वरूप..! ८

*

एक वचनी राघव ,

राम कौसल्या नंदन.

राम भावंडांचा प्राण,

राम संस्कारी चंदन…! ९

*

राम सखा,राम स्वामी ,

राम भक्तीचे आलय.

चिरंजीव हनुमान,

झाला‌ भक्त राममय…! १०

*

राम मैत्रीचे द्योतक

राम शबरीचे बोर

शुद्ध भाव मानव्याचा

दूर‌ सारी चिंता घोर..! ११

*

राम अलौकिक सेतू,

दशानन रिपू नाश.

राम सीता जपनाम,

दूर करी भवपाश…! १२

*

राम प्रजाहित दक्ष

राम रुप लवलाही

रामरक्षा‌ स्तोत्रातून

कृपा‌ प्रासादिक राही..! १३

*

आप्त जनांचे दैवत,

आशीर्वादी कृपादृष्टी.

राम जणू कृष्णमेघ,

करी सदा स्नेह वृष्टी…! १४

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments