श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

आडात नाहि पाणी आता☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

(वनहरिणी)

 

आडात नाहि पाणी आता, सांग कसा रे भरू पोहरा

हरदासाची सरली पोथी, काय नवे ते सांगू तुजला

*

नवजाताच्या नजरेमधले, कुठे कालचे कुतुहल आता

सरळसोट अन् रटाळ केवळ, उरली झापडबंदी आता

*

तीच पुरातन नगरे आणिक अवशेषांची तीच विराणी

त्याच वाहत्या जखमा आणिक अश्रूंचीही तीच कहाणी

*

शोकामधले सरले गुंजन, वाहुन वाहुन सुकले ओघळ

तेच कालचे घाव आजही, जातिवंत तो शिणला विव्हळ

*

अंतहीन त्या अंध रातिला, का दावावा सूर्य उद्याचा

का फासावा पराभवांना, रंग विलक्षण हौतात्म्याचा

*

सृजनाचा हा जन्मोत्सव की, जन्मा आले मरण नव्याने

असा कसा हा दीपराग की, ज्योती गिळल्या काळोखाने

*

किति टांगावी वेशीवरती, मी माझी ही अशी लक्तरे

कुठवर न्यावी भर बाजारी, घरंदाज ही माझी दुःखे

*

मगरमिठीतुन तुझिया कविते, विमुक्त मजला जरा होउ दे

तुझ्या पारही बरीच दुनिया, दुनियादारी मला शिकू दे !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments