कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव ?

☆ हनुमान जयंती विशेष – रामभक्त हनुमान…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कपी केसरी अंजनी,

करी शिव आराधना.

जन्मा यावे महादेव,

करी दांपत्य याचना…!१

*

वानरांचे रुपांमध्ये,

शिव पार्वती गमन.

माता पार्वतीचा गर्भ,

वात केसरी वहन..!२

*

अंजनीचे  पोटी आले,

शक्तीशाली शिवरुप.

वायुदेव केसरीचे,

भक्तीमय निजरूप..!३

*

भक्ती शक्तीचा वारसा,

रुप वानराचे घेई.

अंजनेरी पर्वताते,

शिवतेज जन्मा येई…!४

*

शारीरिक मानसिक,

धैर्य सामर्थ्य अफाट.

रामभक्त‌ मारुतीचे ,

शौर्य,साहस,अचाट…!५

*

त्याग,शौर्य सेवा,भक्ती ,

आले जेव्हा मूर्त रुप.

वायूपुत्र मारुती हा,

बजरंग निजरुप..!६

*

दैवी शक्ती वरदाने,

झेप घेई अकल्पित.

सूर्य बिंब गिळंकृत.

बाललीला संकल्पित…!७

*

सूर्य देव संकटात,

इंद्रदेव सजा देई.

वज्राघाते हनुवरी,

बालकांते दूर नेई…! ८

*

हनुर्भंग होता क्षणी,

नाम झाले हनुमंत.

असा बलशाली पुत्र,

चिरंजीवी गुणवंत…!९

*

गुण खोडकर वृत्ती,

देई त्यास अभिशाप.

पडे शक्तीचा विसर,

भोगीतसे भवताप…! १०

*

राजा सुग्रीवाचे धामी,

सेवा कार्य ते अर्पित.

राम भेट होता क्षणी,

केला देह समर्पित…!११

*

रामायणी हनुमान,

रामभक्त रामदूत

झाला भक्त बजरंग

महाबली कपीसूत…!१२

*

शक्ती सामर्थ्याची शक्ती,

नामातून चेतविली.

विस्मरणे गेली शक्ती,

जांबुवंते जागविली…!१३

*

जिथे जिथे राम नाम,

तिथे हनुमंत जागा.

चिरंजीव होऊनिया,

जोडी कैवल्याचा धागा…!१४

*

हाती आली दिव्य गदा,

शक्ती‌बल सामर्थ्याने.

पराभूत होणे नाही,

वीर अजिंक्य शौर्याने…!१५

*

निष्ठा आणि पराक्रम,

युद्ध कौशल्य विपुल.

दास रामाचा निस्वार्थी,

बुद्धी चातुर्य अतुल…!१६

 

*

कैक योजने उड्डाण,

सप्त सागर लांघन.

गदाधारी हनुमान,

साध्य शक्ती संघटन..!१७

*

इच्छाधारी लाभे रुप,

पिता देई वरदान.

सूक्ष्म विराट रुपात,

विहरतो हनुमान…!१८

*

त्याच वरदाने त्याने,

शोधियली सीतामाई.

साक्ष मुद्रिका घेऊनी,

दिली सुरक्षेची ग्वाही..!१९

*

राम नामाची महती,

कृतीतून दाखविली.

एका राम सेवकाने,

झणी लंका पेटविली…!२०

*

सीतामाई शोधताना,

केले लंका निरीक्षण.

हेर रामाचा होऊन,

केले गुप्त सर्वेक्षण…!२१

*

सीतामाई संवादात

सिंदुराचा लागे शोध

दीर्घायुष्य आरोग्याचा

रामभक्त घेई बोध…! २२

*

झाला भगवा केशरी,

सर्वांगासी विलेपन.

पाहुनीया हनुमंता,

संतोषले राममन…! २३

*

बजरंग दिले नाम,

जाणियली दिव्य शक्ती.

बजरंग बली रुप,

दर्शविते राम भक्ती…! २४

*

रामसेतू बंधनात,

बजरंग दावी दिशा.

राम जयघोषी सरे,

तमोमय दुःख निशा..! २५

*

राम रावण युद्धात,

हनुमान अग्रेसर.

दृढ विश्वास निष्ठेचा.

हाची एक रत्नाकर…!२६

*

कौमोदकी दिली गदा,

कुबेराचे वरदान.

हाती असेल जोवरी,

अजिंक्यसा बहुमान..!२७

*

वायु देवतेच्या कृपे,

प्राप्त झाल्या सिद्धी शक्ती.

रामायण प्रसंगात,

दृढ झाली राम भक्ती…! २८

*

सप्त सिंधू उल्लंघन,

घर्मबिंदू गर्भ रुप.

तोची हनुमंत सूत,

मगरीचे निजरूप..!  २९

*

करी घात कलंकीत,

काल नेमी एक पूत.

मामा असे रावणाचा,

दैत्य मारिचाचा सूत…!३०

*

रुप साधुचे घेउन‌,

हनुमंता अडविले.

द्रोणागिरी आणताना,

कार्य थोर थांबविले…!३१

*

ओळखून खरे रूप,

दिली सजा योग्य ठायी.

तोच दैत्य कालनेमी,

दिसे मारुतीच्या पायी..!३२

*

शनी पिडा निवारण,

करा मारुतीचे ध्यान.

भूत प्रेत सरे बाधा,

रक्षीतसे पंचप्राण..!.३३

*

जिथे जिथे राम नाम,

तिथे तिथे उभा दास.

यांच्या अंतरात आहे,

राम सीता सहवास…!३४

*

देव शक्तीशाली असा,

चिरंजीव भक्त रूप .

सेवा भक्ती साधनेत,

जळे रामनाम धूप..!.३५

*

आहे वज्र याचे करी,

मुष्ठीमधे आहे शक्ती.

बलशाली‌ हनुमान ,

शिकवितो दास्य भक्ती…!३६

*

तेज तत्व जिंकणारा,

वायु पुत्र हनुमान .

शक्ती,स्फूर्ती नी उर्जेचे,

आहे मारुती प्रमाण…!३७

*

शंकराचे पाशुपत,

वरदान अजेयाचे  .

शूल त्रिशुलादी शस्त्रे,

शक्ती सामर्थ्य दासाचे…! ३८

*

नखाग्राने रामनाम,

केळीच्याच पानावरी.

लिहितसे बजरंग ,

रामनाम वर्णाक्षरी…!३९

*

स्वामी निष्ठ‌ सेवकाला,

तेल शेंदूर अर्पण.

माळ रुईच्या पानांची,

भक्ती भावे समर्पण.४०

*

असा बजरंग बली,

बलोपासनेचे धाम.

होई हजर सत्वर,

उच्चारता राम नाम…!४१

*

कविराजे ‌वर्णियेला

यथाशक्ती हनुमान

शब्द शारदा पुरवी

अनुभूती वरदान..!४२

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments