श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ प्रतिबिंब… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
☆
लाजऱ्या डोळ्यांत तिचियां, हळूच मी डोकावलो,
पाहता प्रतिबिंब माझे, थबकलो, भांबावलो ||धृ. ||
*
लाजण्याला अर्थ होता, हास्यातही भावार्थ होता,
गूढ काही स्वार्थ होता, मी तरीही हरवलो ||१||
*
श्वासही बेबंद होता, त्यातही संकोच होता,
भान का हरवून बसलो? मी मनाशी बोललो ||२||
*
शुक्रतारा मंद होता, प्राचीलाही गंध होता,
का? कसे कळलेच नाही, केशपाशी गुंतलो ||३||
*
दोन धृवांची कहाणी, गीत मी अन् तू विराणी,
ओळखीची वाट तरीही, एकटा मी चाललो ||४||
☆
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈