☆ कवितेचा उत्सव ☆ पहाट ☆ श्री प्रकाश लावंड ☆
कितीकदा खरडावी
जिण्यावरली काजळी
किती टाकू तराजूत
माझ्या कष्टाच्या ओंजळी
सारं आयुष्य टांगलं
असं पासंगाच्या पारी
तरी पारडं राहिलं
कायमच अधांतरी
किती भरावा रांजण
त्याची थांबंना गळती
येता येता सुखं सारी
वाऱ्यावरती पळती
जादा मागत नाहीच
मोल कष्टाचं रं व्हावं
शेतामध्ये राबताना
गाणं सर्जनाचं गावं
उत्साहात उगवावी
माझी प्रत्येक पहाट
समाधानानं लागावी
राती धरणीला पाठ
© श्री प्रकाश लावंड
करमाळा जि.सोलापूर.
मोबा 9021497977
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈