सौ.ज्योत्स्ना तानवडे
☆ विविधा ☆ तू आहेस खास … ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
ओळखलस का मला? अग तू आणि मी वेगळ्या का आहोत ? तू माझं स्त्रीत्व आणि मी तुझं अस्तित्व. दोघी एकमेकींच्या प्राणसख्या. म्हटलं तर एका नाण्याच्या दोन बाजू, म्हटलं तर दिवा आणि ज्योती,म्हटलं तर जीव आणि आत्मा, म्हटलं तर शरीर आणि सावली, म्हटलं तर बरंच काही. दोघीही एकमेकींशिवाय अपूर्णच.
प्रेम, माया, जिव्हाळा, सहवेदना तळमळ, माणुसकी अशा सगळ्या संवेदनांची तू जणू पुतळीच. आपल्या बरोबरच, किंबहुना आपल्या आधी समोरच्याचा विचार करणारी. कुटुंबातील प्रत्येकाची नस ओळखून योग्य काळजी घेणारी. शेजार पाजार, नातलग, स्नेही सोबती अशा सर्व समाजघटकांना आपलं मानून त्यांच्यासाठी मदतीला धावणे हा तुझा स्थायीभाव.दुसऱ्यांच्या भल्याची तुला सदैव आस म्हणूनच तू आहेस खास.
कुठल्याही वेदना, त्रास, संकटे, कष्ट, धावपळ, जबाबदाऱ्या, अडीअडचणींना न घाबरता पाय घट्ट रोवून आलेल्या परिस्थितीचा सामना धीराने, संयमाने, आत्मविश्वासाने करण्याचा तुझा स्वभाव. म्हणूनच घरातल्या प्रत्येक नात्याला योग्य न्याय देत, प्रत्येक जबाबदारी तू योग्यपणे मनापासून पार पाडलीस. प्राप्त परिस्थिती कौशल्याने हाताळत संसाराची, आयुष्याची वाटचाल आनंदाची, समाधानाची, उत्तम यशाची केलीस.म्हणूनच तू आहेस खास.
कोणतेच कष्ट, त्रास यांना तू कधी घाबरली नाहीस. प्रत्येक गोष्टीत संघर्ष हा अटळ असतो. अंतिम ध्येयावर लक्ष देत तू प्रत्येक संघर्ष मोठ्या हिकमतीने लढलीस.मुळात ज्या वेदनांचे फळ आनंददायी असते त्या वेदनांचे दुःख कधी करायचे नसते, यावर तुझा ठाम विश्वास आहे. त्यातूनच तू छान विकसित होत गेलीस म्हणूनच तू आहेस खास.
मातृत्वाच्या कळा सोसत तू माय लेकरांच्या सुंदर नात्याला जन्म दिलास. आईपण अगदी भरभरून उपभोगलेस. दोन अतिशय गुणी, कर्तृत्ववान, सुसंस्कारीत आधारस्तंभ आज तुझ्या आधाराला सज्ज आहेत हे केवढे मोठे संचित आहे. कुणालाही हेवा वाटावा असं दान तुझ्या झोळीत आहे. म्हणूनच तू आहेस खास.
देवावर तुझी श्रद्धा आहे. स्वकर्तृत्वावर ठाम विश्वास आहे. माणसांची ओढ आहे. निसर्गाचे वेड आहे.कलेची आवड आहे. आपली क्षमता, आपली आवड, आपल्या मर्यादा तू चांगल्या ओळखतेस. म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक क्षेत्रातल्या गोष्टींचा तू भरभरून आस्वाद घेतलास. आनंद उपभोगलास. म्हणूनच तू आहेस खास.
कित्येकदा तू तुझ्या इच्छा-आकांक्षा, आनंद घरासाठी, इतरांसाठी दूर सारलास. आता एवढंच सांगावसं वाटतंय की,तुझं तुझ्याप्रती सुद्धा काही कर्तव्य आहेच ना.आता स्वतःच्या इच्छेप्रमाणे वाग. स्वतःला थोडा वेळ दे.आवडत्या गोष्टी कर.जे करायचे राहून गेले ते सर्व आवर्जून कर.यशाची मानकरी हो.मनाप्रमाणे आनंद घे. मला माहित आहे आपल्या या आनंदातही तू इतरांना सामावून घेत आनंद वाटशील. कारण तू आहेसच खास.
तुझ्या कर्तृत्वाचा, तुझ्या संवेदनांचा उत्सव एक दिवसाचा नाहीच होऊ शकत. कारण तू आजन्म अशीच आहेस.कोणी विचारो ना विचारो, मान देवो ना देवो तू आपल्या अंगभूत गुणगौरवाने आनंदाची उधळण करीत आपल्या मार्गावर चालत आहेस आणि म्हणूनच तु खूप खूप खास आहेस. तू माझी लाडकी प्राणसखी आहेस.
© सौ. ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈