☆ कवितेचा उत्सव ☆ दोष कुणाचा ☆ सौ.नीलम माणगावे ☆
वेदनेचं गळू
ठस ठसू लागलं की ती सरळ
कांदा घेऊन,
विळीवर
चिरायला बसायची!
कळत नकळत
गळवा ला पिन टोचून,
मोकळं सोडायची
आणि वाहत्या धबधब्यात
पार बुडून जायची!
पण आता,
कांदा चिरून झाला तरी
डोळ्यात येत नाही
पाण्याचा टिपूस
समजत नाही,
हा दोष कुणाचा?
कांद्याचा?
की तिनं,
जुळवून घेतलेल्या
नव्या सांद्याचा?
© सौ.नीलम माणगावे
जयसिंगपूर
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
वेदनांचे भावपूर्ण शब्दांकन.