☆ कवितेचा उत्सव ☆ माझ्या माहेराची वाट ☆ श्री आनंदहरी ☆
माझ्या माहेराची वाट
झाली पुसट पुसट
दिस लोटले किती हे
नाही कुणाचीच भेट
मन ओढाळ वासरू
त्याला कसे मी आवरू
चित्त थाऱ्याव राहीना
कशी मलाच सावरू
मायसावलीची ओढ
रामरगाडा हा द्वाड
किती करता सरंना
जीवा वाटते ना गोड
शब्द ओठात ना जरी
बाप डोळ्यांनी बोलतो
मला उराशी धरुनी
काळजात साठवतो
मना माहेराची आस
मन माहेरात राही
चुलीवर ठेवलेलं
दूध हळू उतू जाई
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈