☆ कवितेचा उत्सव ☆ कुठे कुठे क्षितिजाशी ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆
दूर कुठे क्षितिजाशी टेकडीच्या माथ्यावर |
शांत रम्य जागी उभे एक शिवाचे मंदिर ||१||
चार वृक्ष भोवताली दिसे वनश्रीची शोभा |
गाभाऱ्यात तेज फाके शिवपिंडीची ती प्रभा ||२||
भक्तिरंगी परिसर होई सांजेच्या वेळेला |
पक्षी येती झाडांवर भक्तगण आरतीला ||३||
पलीकडे शांत नदी जळ संथ संथ वाहे |
उतरत्या सांजवेळी सूर्य डोकावून पाहे ||४||
एक भगवी पताका मंदिराच्या वर डुले |
शांत नदीपात्रामध्ये दूर दूर होडी चाले ||५||
भास्कराचा लाल गोळा बुडताना पाण्यावर |
येई क्षितिजाभोवती लाल केशरी किनार ||६||
मंद नंदादीप तेवे शंकराच्या गाभाऱ्याशी |
हळू येई संध्याराणी कुठे कुठे क्षितिजाशी ||७||
नंदादीपाच्या तेजाने जाई भरून गाभारा |
झाला निशेच्या अधीन रम्य आसमंत सारा ||८||
© सुश्री प्रज्ञा मिरासदार
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈