स्व विंदा करंदीकर
स्व गोविंद विनायक करंदीकर ख्यातनाम ‘विंदा करंदीकर’
जन्म – २३ ऑगस्ट १९१८ – मृत्यू – १४ मार्च २०१०
☆ कवितेचा उत्सव ☆ विंदा करंदीकर स्मृती दिनानिमित्त – आयुष्याला द्यावे उत्तर.. स्व विंदा करंदीकर ☆
प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆
(१४ मार्च ..ज्ञानपीठ पुरुस्कार विजेते महाकवी स्व विंदा करंदीकर यांचा अकरावा स्मृतीदिन ..त्या निमीत्ताने त्यांची एक कविता…)
असे जगावे दुनियेमधे,आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखूनी नजरेमधे, आयुष्याला द्यावे उत्तर।।
नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी तार्यांची
आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची।।
असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखूनी नजरेमधे, आयुष्याला द्यावे उत्तर।।
पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना
हंसु असावे ओठांवरती, काळीज काढून देताना।।
संकटासही ठणकावून सांगणे, आता ये बेहत्तर
नजर रोखूनी नजरेमधे, आयुष्याला द्यावे उत्तर।।
करुन जावे असेही काही, दुनियेतुनी या जाताना
गहिवर या जगास सार्या, निरोप शेवटचा देताना।।
स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखूनी नजरेमधे, आयुष्याला द्यावे उत्तर…।।
- स्व विंदा करंदीकर
?? अशा आवेशपूर्ण,स्फूर्तीदायक,निर्भीड सकारात्मक संवेदनशील काव्यरचनाकाराला मानाचा मुजरा आणि भावपूर्ण स्मृतीवंदना!!! ??
प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈