प्रा. सौ. सुमती पवार
☆ कवितेचा उत्सव ☆ आयुष्याचं सार…. ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
आहे आयुष्याचं सार, घरातली ती बायको
तिच्या सारखी हो तिचं, तिची तुलनाच नको
आहे सुकाणू घराची, प्रेम देवताच आहे
घरातला हरएक, तिच्या प्रेमातच राहे…
किती प्रेम पतीवर, तळहाती ती झेलते
सारा मान नि सन्मान, तेथे कधी न चुकते
कर्तव्याला सदा पुढे,काम किती उपसते
हरएक नातं पहा,मनातून जोपासते…
जाते इतकी मुरून, सारे घरच पेलते
चिंता काळज्याही साऱ्या,तिच एकटी झेलते
सारी दुखणी खुपणी, नाही लागत हो डोळा
जीव टाकते इतका, असा कसा जीव खुळा….
सारे घेते ओढवून, घाण्या सारखी राबते
येता संकट जरासे, नवऱ्याला धीर देते
मुले लेकरे तिची हो, जणू तळहाती फोड
काटकसर करून, सारे पुरविते लाड…
कसा करावा संसार, तिच्या कडून शिकावे
जणू आधाराचा वड, साऱ्यांनीच विसावावे
ती कोसळता सारे, घरदारचं मोडते
ती गेल्यावर मग….
तिची किंमत कळते….
ती गेल्या.. वर…
© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक
दि: १३/२/२०२१
वेळ: रात्री १२:०६
(९७६३६०५६४२)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈