☆ कवितेचा उत्सव ☆ कवित्व ☆ सुश्री पूजा दिवाण ☆
कवित्व
मध्यरात्री गाढ झोपेत
स्वप्नांच्या मार्गाने
कवितेचं लखलखत झुंबर
शत- दलांनी पेटतऺ
आणि
झोपेची पार वाट लागते…..
बरं उठायचं नाही असं ठरवलं तर ते बिलोरी काचांचे
शब्दांचे लोभस महाल
सकाळ पर्यंत पार विरून जातात.
अगदी दरीतल्या धुक्या सारखे
किंवा
चहातल्या बिस्कीटा सारखे……….
शेवटी प्रतिभेचे गुणगान गात उठणे भागच असतं
शब्दांना आंजारून गोंजारून
चाल चाल माते करत,
काटे आपल्या पायात मोडून घेत,
कागदावर उतरवावंच लागतऺ………
कवितेच्या कुठला फॉर्म मध्ये शब्दांना बसवायचे ?
तेही आपल्या हातात नसतं!
त्यांचे तेच घेतात हवा तो आकार.
आपण फक्त बघत राहायचं
व अर्थाची सोबत करायची……..
एवढे कष्ट घेतल्यानंतर
हाती आलेलं ते साजरे बाळ
मग आपल्याकडून हक्काने नावाची
अंगडी टोपडी लेऊन
कवितेच्या वहीच्या
पुढच्या पानावर बसतं
व
कवित्व सार्थकी लागतऺ……….
© सुश्री पूजा दिवाण
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈