सुश्री संजीवनी बोकील
☆ कवितेचा उत्सव ☆ ‘नि:संग’ – सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆
स्वत:चं सामान्यत्व
फार छळू लागलं
की म्हातारीच्या पिसाकडे बघावं
स्वच्छंदपणे कसं
उडत असतं हवेत
आपल्याला कुणी गरुड
म्हणत नाही
याची त्याला खंत नसते
बळकट पंख नसल्याचा
खेद नसतो
आकाशाचा अंत गाठण्याचा
हव्यास नसतो
अन् पृथ्वीचा ठिपका
होउन जाण्याइतकी
उंची गाठायचा मोह नसतो.
आपल्याच मस्तीत भिरभिरत
हवेशी जुळवून घेत
आपल्या हलक्या अस्तित्वाला
सहजपणे स्वीकारत
ते मजेत जगून घेतं
उंचावर गेल्यावर
जमिनीची भीती नसते
अन् जमिनीवर उतरल्यावर
नसतो आकाशाचा मोह!
म्हणून
स्वत:चंं सामान्यत्व
फार सलु लागलं
की बघावं
नि:संग भिरभिरणार्या
म्हातारीच्या पिसाकडे….
सुश्री संजीवनी बोकील
(या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.)
प्रस्तति: सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈