श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
? कवितेचा उत्सव ?
☆ वळीव ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई☆
(वृत्त-वसंततिलक)
पर्जन्यधार बरसे बेधुंदफुंद
मातीतुनी दरवळे मृद-गंध मंद
उत्सूक, तप्त, विरही धरणी सखीला
भेटावया वळिव आज अधीरलेला
ग्रिष्मातला पवन शीतळ गार झाला
फांदीतुनी उमटला हिरवा धुमारा
कोकीळ पंचमस्वरातुनि साद घाली
बीजांकुरास लपल्या हळु जाग आली.
‘येईन मी पुनरपी’वचने प्रियेला
देऊन वल्लभ तिचा परतून गेला.
प्रीतीतला क्षण पुरे वदुनी मनात
त्या थोडक्या मिठितही धरणी कृतार्थ.
सद्भाग्यसूचक अशा स्रुजनोत्सवाने
ती प्रेमिका वसुमती भिजली दवाने.
मेघावरी बसून तो बरसेल धारा
आणील वैभव धरा सुफला उद्याला।।
© श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈