श्री सुहास सोहोनी
कवितेचा उत्सव
☆ आधार ☆ श्री सुहास सोहोनी ☆
वादळ आलं, वादळ गेलं …
होणारं ते होऊन गेलं …!
उसना पाऊस, संपून गेला …
उसना वारा, निघून गेला …
लाडका उकाडा, सुरू झाला …
घामाचा मार्ग, मोकळा झाला … ll
पक्ष्यांचं जग उध्वस्त झालं …
किलबिल टाहो फोडत राही …
अंडी फुटली, पिल्लं मेली …
जगायला कारण उरलंच नाही … ll
झाड पडलं, छप्पर फाटलं …
पोर उपाशी डोळ्यांत बघते …
खायला प्यायला देणार काय …
भूक कैदाशिण रोज रोज लागते … ll
‘घाबरु नको’ बोललं कोण …
पाठीशी उभं ठाकलं कोण ..
खांद्यावर खंबीर हात टेकला …
माणसाला माणसाचा आधार भेटला … ll
© श्री सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈