कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक
सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
संक्षिप्त परिचय
शिक्षा – बी. ए. बी.एड.
सम्प्रत्ति – निवृत्त हायस्कूल शिक्षिका
विशेष – कथा, कविता, ललित लेख, बालकथा वर्तमानपत्रातून आणि मासिकातून प्रसिद्ध, आकाशवाणीरुन प्रक्षेपण, ‘जंगल मंगल’ हा बालकविता संग्रह.
विविधा
☆ कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक – शांताबाई शेळके – भाग-1 ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
(जन्म:१२ ऑक्टोबर १९२२ – मृत्यू : ६ जून २००२)
प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री, शांता शेळके या तीन शब्दात त्यांचे वर्णन करुन आपल्याला थांबता येत नाही. त्यांच्या साहित्य सेवेचा आलेख खूप विस्तृत आहे.
त्या प्राध्यापिका होत्या. लेखिका, संगीतकार, बालसाहित्य लेखिका, पत्रकार होत्या.मराठी चित्रपटातील त्यांची गाणी आजही अनेकांच्या ओठावर आहेत.
शांता जनार्दन शेळके यांचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे बावीस साली पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला. पुण्यातील हुजूरपागा येथे शालेय शिक्षण आणि नंतर स. प. महाविद्यालयात पुढील शिक्षण झाले.मुंबई विद्यापीठातून संस्कृत आणि मराठी भाषेत एम्. ए. मध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
आचार्य अत्रे यांच्या नवयुग मध्ये उपसंपादक म्हणून त्यांनी काम केलं. समिक्षा स्तंभ लेखिका, पत्रकारिता यांचा त्यांना चांगला अनुभव मिळाला. हिस्लाप महाविद्यालय नागपूर, मुंबईतील रुईया, महर्षी दयानंद महाविद्यालय येथे मराठीच्या प्राध्यापिका म्हणून ही काम केले. मराठी, संस्कृत, इंग्रजी या तिन्ही भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. शिक्षण पुण्यात; जोडीला प्राध्यापिका, पत्रकार, सहसंपादिका म्हणून अनुभव; असे असले तरी महाराष्ट्राचं ग्रामीण जनजीवन त्यांच्या साहित्याचा मूळ आधार होता. कारण बालपणातील बराच काळ खेड मंचरच्या परिसरात गेला. प्राथमिक शिक्षणही तिथंच झाले.त्यामुळं लोकसाहित्य हा त्यांचा आवडीचा विषय होता.
स्री मनाच्या अनेक अवस्थांचे वर्णन नेमक्या शब्दात व्यक्त करणारी अनेक गाणी लोकप्रिय झाली. तरुण स्रीचा खट्याळपणा असो, धीटपणा असो, अगर सल्लज भावना; त्यांच्या कवितेत सरळ, शुद्ध निरागस आत्मविष्कार दिसून येतो. भाषाप्रभूत्व असल्याने त्या सहजतेने लिहून जातात, तरी त्यातील प्रासादिकता वाढतच जाते. त्यांची काव्य शैली ओघवती आणि लालित्यपूर्ण असल्याने कविता असो किंवा चित्रपटातील गाणी, ती अनेकदा ऐकली तरी परत परत वाचाविशी वाटतात, ऐकावीशी वाटतात.
©️ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈