कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक
स्व शांताबाई शेळके
कवितेचा उत्सव
☆ तोच चंद्रमा नभात ☆ स्व शांताबाई शेळके ☆
(
तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी
एकांती मज समीप तीच तू ही कामिनी
नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच तिच गंध मोहिनी
एकांती मज समीप तीच तू ही कामिनी
सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे
मी ही तोच, तीच तूही, प्रीती आज ती कुठे
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी
एकांती मज समीप तीच तू ही कामिनी
त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतूनी
एकांती मज समीप तीच तू ही कामिनी
चित्र साभार – Shanta Shelke – Wikipedia
स्व. शांताबाई शेळके
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈