श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ ज्येष्ठ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
शुष्क धरेवर शुभ्र घनासह पाय रोवले ज्येष्ठाने
कपाशीपरी मेघ भासती,की पंख पसरले हंसाने
वसंत सरला,ग्रीष्म भडकला,आग पेटली चोहिकडे
गुलमोहर हा उतू चालला,केशर मिश्रित पडती सडे
दिवस लांबले,पवन थांबले,पानोपानी रंग बदलले
सर हलकिशी यावी म्हणूनी आसुसलेले हे डोळे
कुटुंबवत्सल कुठे पक्षिणी घरट्यातून विसावे
मातीमधुनी क्वचित कोठे मृगकीटक खुणावे
ज्येष्ठ तपस्वी ॠषीमुनीसम या धवल मेघमाला
श्यामवर्ण मेघांचा होईल,सुखवी जो बळीराजाला.
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈