श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ मनोगत…ख-या स्वातंत्र्य सैनिकाचे ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
आयुष्याची केली आम्ही हासत हासत होळी
सरणावरती अमुच्या त्यांनी भाजियली पोळी
सत्तांधांचा सूर्य गाडला ज्या धरणीवर आम्ही
त्या धरणीवर स्वातंत्र्याचा सूर्य ग्रासिला यांनी
स्वदेशीसही जपले आम्ही नेसून अंगावर खादी
‘ खादी’ चे हे भक्त तयांना ठावे एकच गादी
लाठीचे वण अजून ओले,अजून ओल्या जखमा
या चोरांचे वर्णन करण्या अपुरी पडते उपमा
स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये समिधा अमुचे प्राण
भूमी कसली ही तर होती नररत्नांची खाण
अपुल्या आई साठी मरणे हा होता अभिमान
नव्हत्या फुसक्या शपथा अमुच्या ‘मेरा देश महान’
चुकली अमुची गणिते, आता उत्तर येते शून्य
या डोळ्यांनी बघवत नाही,आई,रूप तुझे हे छिन्न
सुटला बापू तुम्ही,अहिंसा क्षणभर हरली होती
आम्ही रोजच हरतो आहो, तत्वांची झाली माती
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈