सौ.ज्योत्स्ना तानवडे
कवितेचा उत्सव
☆ देश माझा देवभूमी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
दिन स्वातंत्र्योत्सवाचा
करू आनंदे साजरा
महामारी रोखूनिया
आश्वासिले घराघरा ||१||
देश आपुला महान
शूरवीर नररत्नं
ज्ञान विज्ञान अध्यात्म
साऱ्या कलांचीही खाण ||२||
कार्यक्षम युवाशक्ती
आहे संपत्ती देशाची
राखू देश सुरक्षित
कास धरू प्रगतीची ||३||
हक्कांसाठी भांडताना
कर्तव्यास नित्य स्मरू
स्वतःआधी देश हीत
ऐसे आचरण करू ||४||
विसरूनी भेदाभेद
बळ एकीचे जाणत
देशासाठी संघटीत
राहू नित्य कार्यरत ||५||
नैसर्गिक संपन्नता
देश आहे भाग्यवान
निसर्गास या जपून
करू देश बलवान ||६||
नाव देशाचे उज्ज्वल
त्याग, शौर्याने करूया
देश माझा देवभूमी
तिचे श्रेष्ठत्व राखूया ||७||
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈