श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
कवितेचा उत्सव
☆ अभंग .. विठ्ठलाचे रुप ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆
सुंदर सावळा लेकूरवाळा
राहतो पंढरीसी विठराया।।ध्रु.।।
विठ्ठलाचे रुप
साजिरे गोजिरे
सुंदर ते ध्यान
उभे सदा।।१।।
सुवर्ण रत्नांचा
मुगुट तो छान
तुझिया शिरी
साज चढे।।२।।
शेंदरी हा छान
अष्टगंधी टिळा
तुझिया कपाळा
शोभिवंत।।३।।
हऱ्या सुगंधित
तुळशीच्या माळा
तुझ्याच रे कंठी
शोभे छान।।४।।
कटी हेमपट्टी
कटेवरी कर
कासे पितांबर
शोभतसे।।५।।
देखोनिया डोळा
पाऊले ही तुझी
शमे आस माझी
पांडुरंगा।।६।।
ठेवियेला माथा
तुझिया पाऊली
देई तू साऊली
निरंतर।।७।।
जमविलास तू
भक्तांचा हा मेळा
लेकूरवाळा तू
म्हणवीसी।।८।।
जनाईच्या साठी
जाशी तू धावूनी
चोखयाचा मळा
फुलवीसी।।९।।
गुण तुझे किती
गाऊ मी अंनता
प्रसाद दे आता
मम करी।।१०।।
© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈