श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ शिक्षक दिन विशेष – गुरूदक्षिणा ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
मातीच्या या गोळ्याला तुम्ही दिला आकार
आज असे सत्कार ,गुरूजी,आज असे सत्कार .
ज्ञानाची तुम्ही दिलीत दीक्षा
वेळप्रसंगी करूनी शिक्षा
क्षणोक्षणी घेऊन परीक्षा
त्या ज्ञानाच्या सामर्थ्याने दिला आम्हा आधार
आज असे सत्कार,आपला,आज असे सत्कार.
मन-भूमीतील काढूनिया तण
संस्कारांचे करून शिंपण
गुणवत्तेचे शोधुनिया धन
त्या कष्टाचे फलित,अमुचे विवेक आणि विचार
आज असे सत्कार ,आपला,आज असे सत्कार,
दिवस आजचा गुरुपूजनाचा
तव स्मरणाचा, कृतज्ञतेचा
ज्ञानमंदिरा आठवण्याचा
गुरूदक्षिणा एकच, तुमचे स्वप्न करू साकार
आज असे सत्कार,आपला,आज असे सत्कार
गुरूजी,आज असे सत्कार
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
समयोचित काव्य व भावलेली कविता छान धन्यवाद