सौ.ज्योत्स्ना तानवडे
कवितेचा उत्सव
☆ ? गौराई ? ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
आल्या ‘गौराई’ या घरी
विराजिल्या मखरात
त्यांच्या प्रसन्न कृपेची
करिताती बरसात !!
दारा तोरण बांधिले
रांगोळीचे रेखाटन
त्यांच्यासाठी दारापुढे
सजविले वृंदावन !!
ज्येष्ठा कनिष्ठा बहिणी
गोड माहेरवाशिणी
त्यांच्या माहेरी येण्याने
डोळा आनंदाचे पाणी !!
कौतुकाच्या ग पाहुण्या
किती करून त्यांचे लाड
त्यांच्यासाठी रांधियले
नाना पदार्थ हे गोड !!
किती गाऊ त्यांचे गुण
त्यांच्या गुणा नाही पार
दोन दिस आल्या तरी
त्यांचा वास सालभर !!
माझी माऊली दयाळू
सर्वांवरी कृपा करी
तुझ्या समृद्धीच्या खूणा
ठेव आई घरी दारी !!
तुझ्या समृद्धीच्या खूणा
ठेव आई घरी दारी !!
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈