सुश्री मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ गणेश विसर्जन ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
नाद रंग अन उत्साहाचा , उत्सव चाले चोहीकडे
परि या जल्लोषात हरवली, उत्सवमूर्ती कुणीकडे ——-
दहा दिवस त्या मांडवात ,बांधून घातले त्यालागी
आज त्यास किती बरे वाटले, घरी जाण्याची घाई उगी —–
रात्रीपासून मोटारीवर बसवून त्याला ठेवियले
सहनशील हा गजानन परि, आसन ना त्याचे ढळले —–
सकाळपासून जल्लोषाला पूर पहा हो किती आला
वाजतगाजत जमले सगळे, उधाण आले उत्साहाला —–
मोटारीवर मुकाट बसुनी, गणपती सारे पहात होता
जाणवले त्यालाही होते, तो त्या गर्दीत चुकला होता —–
लेझीम-ढोल नि टिपरीचा तो तालही गर्दीमध्ये हरवला
धांगडधिंगा किती चालला, विसरलेच त्या गजाननाला —-
छंदच नित त्या ,सकल जनांना चकवीत असतो नशीब रूपे
म्हणे, “ आज मी स्वतःच चकलो, चकविती ही माझीच रूपे “—–
विचार करता करता थकुनी, गजाननाचा लागे डोळा
दचके जेव्हा जागे होता दिसे तळपता सुवर्ण गोळा ——
जाण्याचा की दिन पालटला, कसल्या भक्तांशी ही गाठ
जातो जातो म्हणतो तरिही सोडती ना ते त्याची वाट ——
“पुढच्या वर्षी नक्की येईन “ म्हणे “ एक परि शर्त असे
लैलामजनूची गाणी नको, मज सनई-चौघडा पुरे असे ——
बीभत्स वर्तन कुठे नसावे, मंगल वातावरण हवे
माझ्या नावे सर्वार्थाने जनजाग्रण व्हायाची हवे “—–
—- गजाननाचेही मन हाले, या भक्तांचा निरोप घेता
जलमार्गे जाताजाता त्या पाण्यावर हलती लाटा —–
—–” काल स्वतःतच आम्ही गुंगलो, जणू त्याचाही विसर की पडला
आज तयाला निरोप देता, मनमांडवही रिताच झाला “ ——-
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈