श्री उदय गोपीनाथ पोवळे
कवितेचा उत्सव
☆ पाऊस ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
पाऊस टाळ मृदूंग
वाटे विठ्ठल माउली
माळकरी ते दंग
भासे देवाची सावली
पाऊस बडवी ढोल
पाऊस तडतड ताशा
कधी जोशात बोल
भासे मांडला तमाशा
पाऊस नाचे लावणीय
पाऊस दिसे लक्षणीय
रंभा उर्वशी नर्तकी
भासे अप्सरा स्वर्गीय
पाऊस पहाटे भूपाळी
निशेला जोड भैरवीची
पाऊस मेघ मल्हार
भासे बैठक सुरावटीची
पाऊस बासरी कान्हाची
कधी मोहक अवखळ
पाऊस एकतारी मीरेची
भासे ओंकार निखळ
पाऊस प्रतीक मैत्रीचे
धरती गगन भेटीचे
पाऊस वाजवी सनई
भासे मिलन अद्वैताचे
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
मो. नं. ९८९२९५७००५.
ठाणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈