सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
कवितेचा उत्सव
☆ जलचक्र.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे☆
स्वच्छ पांढऱ्या जलदां ची,
निळ्या आभाळी होती वर्दळ!
कधि त्यांनी प्राशून घेतले,
बाष्पातुन ते जल निर्मळ!
काळ्याकुट्ट ढगांची मैफल,
भरली होती आकाशात !
वाटत होते जलभरले ढग,
उतरतील कधी या भूतलात!
सौदामिनी चा लखलखाट,
अन् ढगांचा गडगडाट !
ढगाळलेल्या आभाळाला,
वाऱ्याने ही दिली साथ!
झरझर झरझर धारा आल्या,
तप्त धरेला भिजवू लागल्या!
धरतीच्या कुशीतील बीजांना,
जीवन रस पुरवाया गेल्या!
रंग बदलला, हवा बदलली,
ओढ लागली दानाची!
जिथून घेतले तिथेच देऊ,
जल धाराही पुण्याची !
© सौ. उज्वला सहस्रबुद्धे
वारजे, पुणे (महाराष्ट्र)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈