स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’
जन्म – 1 ओक्टोबर 1919 मृत्यु – 14 डिसेंबर 1977 ☆
☆ कवितेचा उत्सव ☆ मेघदूत ☆ महाकवी ग.दि. माडगूळकर ☆
मेघदूत
जा घेऊन संदेश !
मेघा,जा घेऊन संदेश!
उल्लंघुनिया सरिता,सागर,नानापरिचे देश
रणांगणावर असतील जेथे
रणमर्दांची विजयी प्रेते
गगनपथाने जाऊन तेथे
प्राणसख्याच्या कलेवराचा निरखून घे आवेश
हाडपेर ते थेट मराठी
हास्य अजूनही असेल ओठी
शवे शत्रूंची असतील निकटी
अंगावरती असेल अजूनी सेनापतीचा वेष
अर्धविलग त्या ओठांवरती
जलबिंदूंचे सिंचून मोती
राजहंस तो जागव अंती
आण उद्याच्या सेनापतीला जनकाचा आदेश
डोळ्यांमधली तप्त आसवे
थांबच देत्ये गड्या तुजसवे
पुढे न आता मला बोलवे
सांग गर्भिणी खुशाल आहे पोटीचा सेनेश
ज्योतीसाठी जगेल समई
भिजविल तिजला रूधिरस्नेही
वाढत जाईल ज्योत प्रत्यही
नकाच ठेऊ आस मागची,इतुके कुशल विशेष
जा घेऊन संदेश !
मेघा,जा घेऊन संदेश!
उल्लंघुनिया सरिता, सागर,नानापरिचे देश.
गीतकार- महाकवी ग.दि. माडगूळकर
चित्र : साभार Gajanan Digambar Madgulkar – Wikipedia
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈