सौ.मंजुषा सुधीर आफळे
कवितेचा उत्सव
☆ शक्तीपीठ ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆
स्वयंभू ही सृष्टी रत्ने
किती पारखावी कशी?
सौंदर्याची खाण असे
दृष्टीत मावेल कशी?
निळ्याशार नदीकाठी
कातळी गं हिरवाई
जणू पाचू अंगठीत
कोंदण्याची झाली घाई
सिंहासन शोभे पाहा
विराजे,”जय भवानी”
बेटावरी अधिष्ठित
हो, आईगिरी नंदिनी
निरव शांततेत मोद
स्निग्ध श्वास परिमळे
पावन या भूमीवरी
फुलती भक्तीचे मळे
शक्तीपीठ रमणीय
भक्त भेटीत तुष्टते
विश्रांती घेत इथेच
स्पंदनी मंद हासते
गाऱ्याणी गाती सगळी
कुणी ना बोले, मी सुखी
परी ऐकून घेते, ती
कृपा करीते सुमुखी.
आनंदले त्रिभुवन
दिव्यस्थळी निर्मळता
देवभूमीस भेटण्या
नशीबी यावी योग्यता.
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
६/१०/२०२१.
विश्रामबाग, सांगली.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈