सौ. विद्या वसंत पराडकर
कवितेचा उत्सव
☆ आदिशक्ती ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆
आदिशक्ती तू असे माऊली
अनादि अनंतकाळाची साऊली
अनुपम रूप तुझे त्रिभुवन सुंदरी
तान्हुली विनवी मम चित्ती वास करी
फुलांपरी तू सुकोमल प्रसन्न
परी धर्म रक्षण्या होशी वज्र
नवरात्री असुरांशी समर करून
दिले विजयादशमीचे दिव्य दालन
विश्व तारावया येशी भूवर
भक्तांची नौका करी पार
कधी अमरावती ची अंबाबाई
तर कधी माहूरगडची रेणुकामाई
महालक्ष्मी तू कोल्हापूर ची
कुलदैवत तू आमच्या कुळीची
पूजन करते सदाचाराचे
मांगल्य आणि पावित्र्याचे
शक्ती युक्ती चा संगम करूनी
दुष्ट भावनेचा विनाश करूनी
विराट दर्शन भक्ता दाखवुनी
विश्व नाचवले आंनदी होऊनी
देहरुपी तबकात माझ्या
पंचप्राणाचे दीप लाविते
चारी वाणीची आरती ओवाळीते
षड्विकारांची फुले अर्पिते
जग्जननी तू विश्व रंजिनी
ऊत्सव करितो भावभक्तीनी
शक्ती देवतेशी समरस होऊनी
विनम्र तेने माथा ठेवी तव चरणी
© सौ. विद्या वसंत पराडकर
पुणे.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈