स्व शांताबाई शेळके
कवितेचा उत्सव
☆ लिंब ☆ स्व शांताबाई शेळके ☆
(
निळया निळ्या आकाशाची
पार्श्वभूमी चेतोहार
भव्य वृक्ष हा लिंबाचा
शोभतसे तिच्यावर
किती रम्य दिसे याचा
पर्णसंभार हिरवा
पाहताच तयाकडे
लाभे मनाला गारवा
बलशाली याचा बुंधा
फांद्या सुदीर्घ विशाला
भय दूर घालवून
स्थैर्य देतात चित्ताला
उग्र जरा परी गोड
गन्ध मोहरास याच्या
कटु मधुर भावना
जणू माझ्याच मनीच्या
टक लावून कितीदा
बघते मी याच्याकडे
सुखदुःख अंतरीचे
सर्व करीते उघडे!
माझ्या नयनांची भाषा
सारी कळते यालाही
मूक भाषेत आपुल्या
मज दिलासा तो देई
स्नेहभाव आम्हांतील
नाही कुणा कळायाचे
ज्ञात आहे आंम्हालाच
मुग्ध नाते हे आमुचे !
चित्र साभार – Shanta Shelke – Wikipedia
स्व. शांताबाई शेळके
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈