श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ कवीमन ☆ श्रीशैल चौगुले ☆
मना सावर आता वादळे
स्मृतीत होशील घायाळ
बेट आयुष्याचे सुख-दुःख
दैव वेदनांचे आयाळ.
किती प्रसंगे नाती नि गोती
विरले क्षणात तुझिया
झडतात फुले तसे ऋतू
तुटले सारे पंखबळ.
हताश होऊ नको तरिही
अजून,आशा या क्षितीजा
प्रबळ काळीज भाव निष्ठा
घरटे शब्दांचे सकळ.
नजर जिथवरती जाई
लाटा डोळ्यात मेघ होतील
घाव सोसता कविता होई
वादळाची शमेल झळ.
प्रतिभेचा दास थोर कवी
संघर्षाची होई ऐसी तैसी
अलौकीक ज्ञान तुजपाशी
गगनभेदी संपदा दळ.
सुर्य चंद्र तारका गातील
गुणगान अमर तेजस्वी
जीवन धन्य तुझिया जन्मा
सरस्वती प्रसन्न प्रांजळ.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈