सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ हो प्रसन्न आम्हाते….☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

जय जय दुर्गे माते , भाव दुःखेहरिते ।

नमितो तुजप्रति देवी, हो प्रसन्न आम्हांते ।।

 

सकळांची जननी तू , तू जगउद्धारिणी 

किती असुरा मर्दियले , तू संकटनाशिनी ।।

 

महिषासुर मारला नि , पापच जगी ना उरले 

परि माते आता त्या पापाविण काही नुरले ।।

 

त्या असुरां मारून तू , का विसावलीस अशी 

ते हेरुन असुरसगे , करू धजावती सरशी ।।

 

किती काळ लोटला , महिषासुर गं पुनर्जन्मला 

कलियुगात या माते , तो अतीच गं मातला ।।

 

तेव्हा एकच होता, आता प्रकटे विविध रूपात 

भ्रष्टाचार नि दंगे-धोपे , वर्णू किती शब्दात ।।

 

बेकारी अन महागाई ही , बडगा जातीयतेचा 

किती अस्त्रे या असुरांपाशी , पार न लागे त्यांचा ।।

 

असूर-रूपही किती बदलले , दानव मानव झाले 

भयावह किती चेहरे त्यांचे , मनास जणू लाविले ।।

 

मानव म्हणुनी जवळी जाता , होई अशी फसगत 

भुई धोपटता सर्प निघावा , तशीच गं ही गत ।।

 

तुझ्या कृपेने जरी जन्मती , सगळे ‘ मानव ‘ म्हणुनी 

तरी कुणी त्यातले कितीकां छळती , माणूसपण विसरुनी ।।

 

मनामनात गं कलीच शिरला , तुझे स्थान डळमळते 

कुठे गुंतलीस माते इतकी , तुला का न हे कळते ।। 

 

का तूही भुललीस दिमाख पाहून तुझ्या पूजनाचा 

पामर मी तुज कसे गं सांगू , देखावा गं हा वरचा ।।

 

दुष्कृत्यांना दडवण्यास हा , समाजकार्याचा गं मुलामा 

भीषण वास्तव प्रत्यक्षी , जरी उदात्त भासे ही प्रतिमा ।। 

 

माते जाग तू स्वयेच आता , कारण शोधू नको कुठले 

दार उघड बया “ ऐसे प्रार्थाया , त्राणही ना आम्हा उरले ।। 

 

तव भक्त असूनही किती त्रासलो , सहन न हो काही आता 

धाव घेऊनी तार तू आई , तरीच म्हणू तुज “ तू जगमाता “ ।।  

 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
3 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments