कवितेचा उत्सव
☆ तिकडे कविता अंकुरते…. ☆ श्री अरूण म्हात्रे ☆
पाऊलवाटेवरती त्याच्या कविता बांधित घर जाते
जिकडे पडते नजर तयाची तिकडे कविता अंकुरते
उरात घेऊन जाळ लोटला काळ तरीही तो चाले
त्या ज्वालांचे सत्वच त्याच्या शब्दांमध्ये पाझरते
सहस्त्र लाटा किती वादळे निमूट त्याने पांघरली
जशी उतरता भरती हळवी ओल तीरावर वावरते
निर्जन रस्त्यावरती त्याने झाड व्यथेचे वाढविले
तिथली माती सुजाण इतकी पायदळीही मोहरते
कवितेचे शतदीप लावले स्वतःस त्याने पाजळुनी
अशा कविच्या कवेत येण्या दूर चांदणी हुरहुरते
© श्री अरूण म्हात्रे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈