स्व. भास्कर रामचंद्र तांबे
कवितेचा उत्सव
☆ सायंकाळची शोभा …. ☆ स्व. भास्कर रामचंद्र तांबे ☆
पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर.
झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी
कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी!
हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळीचे
झोके घेते कसे चहुकडे हिरवे गालीचे!
सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे
रंग किती वर त-हेत-हेचे इंद्रधनुष्याचे.
अशी अचल फुलपाखरे फुले साळीस जणु फुलती
साळींवर झोपती जणु का पाळण्यात झुलती.
झुळकन् सुळकन् इकडून तिकडे किती दुसरी उडती
हिरे, माणके, पांचू फुटुनी पंखचि गरगरती !
पहा पांखरे चरोनि होती झाडावर गोळा
कुठे बुडाला पलीकडिल तो सोन्याचा गोळा.
स्व. भास्कर रामचंद्र तांबे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈